‘कमवा आणि शिका’च्या विचारातून ग्रामीण, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी; रयत शिक्षण संस्थेची शैक्षणिक चळवळ महाराष्ट्रभर
विशाल म्हात्रे
तालुका प्रतिनिधी, पनवेल
पनवेल : ग्रामीण, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य रयत शिक्षण संस्थेने केले आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे स्थापन केलेल्या या संस्थेने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.त्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित समाजघटकांच्या मुलांना शिक्षण घेणे मोठे आव्हान होते. आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाच्या मर्यादित सुविधा यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले.
‘कमवा आणि शिका’चा आदर्शविद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका’ही संकल्पनाप्रत्यक्षात आणली.श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि शिक्षण यांचा संगम घडविणारी ही संकल्पना आजही रयतच्या कार्याची ओळख आहे.सर्वांसाठी शिक्षणाचा विचार १९२४ मध्ये संस्थेचे सातारा येथे स्थलांतर झाल्यानंतर सातारा ही रयतच्या शैक्षणिक कार्याची प्रमुख कर्मभूमी ठरली. सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी करून सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे या विचारातून रयतची शैक्षणिक चळवळ विस्तारत गेली.रयत शिक्षण संस्थेचे कार्य केवळ शाळा-महाविद्यालये उभारण्यापुरते मर्यादित राहिले नाही. सामाजिक समता, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि मानवतावादी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. मुलींच्या शिक्षणालाही प्रोत्साहन देत शाळा आणि वसतिगृहांच्या माध्यमातून स्त्रीशिक्षणाला चालना देण्यात आली.
ज्ञानरोपट्याचा झाला विशाल वटवृक्ष
१९१९ मध्ये कर्मवीरांनी लावलेल्या ज्ञानरोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध भागांत रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक कार्य विस्तारले असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विविध स्तरांवर संस्था कार्यरत आहे.
रयतच्या माध्यमातून शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांत आपले योगदान देत आहेत. त्यामुळे रयतची शैक्षणिक चळवळ ही केवळ शिक्षणाची नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचीही चळवळ ठरली आहे.
कर्मवीरांचा विचार पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारातून कर्मवीरांनी उभी केलेली शिक्षणाची चळवळ आजही प्रेरणादायी ठरत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा मूलभूत विचार रयतच्या कार्यातून पुढे नेला जात आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज असंख्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याला प्रकाश देत आहे. ज्ञान, स्वावलंबन आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा रयत शिक्षण संस्थेचा हा ज्ञानवट भविष्यातील पिढ्यांसाठीही प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.





















