आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, अलिबाग येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, पे युनिटमधील प्रलंबित बिले, वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय बिले, शालार्थ आयडी प्रस्ताव, थकीत बिले, डीसीपीएसमधील रक्कम एमपीएसमध्ये हस्तांतरित करणे, पीएफच्या पावत्या, डिजिटलायझेशन, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदानाच्या प्रक्रियेत आणणे तसेच प्राथमिक शिक्षकांच्या निवडश्रेणीसह विविध प्रश्न आमदार म्हात्रे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर मांडले.
सदर सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून संबंधित प्रकरणे तातडीने तपासून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी श्री. महारुद्र नाळे, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. भोपळे, श्रीमती तांडेल, लेखाधिकारी श्री. अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व लिपिक वर्ग उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे दक्षिण रायगड अध्यक्ष श्री. राजकुमार मुंढे, उत्तर रायगड सचिव श्री. विनोद डाकी, उपाध्यक्ष श्री. शहाजी बेरे, दक्षिण रायगड सचिव श्री. आदेश सुतार, प्राथमिक विभाग प्रमुख श्री. निर्भय म्हात्रे, श्री. बबन पाटील, सल्लागार श्री. दीपक मोकल, तालुकाध्यक्ष श्री. संतोष कांबरी, श्री. बडेकर, श्री. अनंत पाटील, श्री. सचिन अभंगे, श्री. नरेश पाटील, श्री. योगेश मर्चंडे, श्री. धानसे, श्री. पोपट कसबे, श्री. पानावकर, श्री. संजय पाटील, महिला आघाडी प्रमुख श्रीमती काप मॅडम, श्री. वाघमारे, श्री. शिकारे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















