श्री. आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी, रायगड.
परळी | दि. 20/12/2025
रा. जि. प. शाळा परळी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध व्यावसायिक ठिकाणी शैक्षणिक भेटीचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवसायांची माहिती घेतली.
या शैक्षणिक भेटीची सुरुवात R.D.C.C. बँक, परळी येथून करण्यात आली. बँकेचे मॅनेजर श्री. पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाविषयी सखोल व सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. बँकेचे कॅशियर यांनी बँकेत होणाऱ्या विविध आर्थिक व्यवहारांची माहिती देत विद्यार्थ्यांचे आपुलकीने स्वागत केले व त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील प्रतिष्ठित मल्लू बेकरी येथे भेट दिली. बेकरीतील विविध पदार्थ कसे तयार केले जातात व त्यांची विक्री कशी केली जाते, याबाबत बेकरीचे मालक मल्लू शेठ यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी श्री. रवी वाघेरे यांच्या वीटभट्टी व्यवसायाला भेट देऊन विट निर्मितीची प्रक्रिया व तंत्र प्रत्यक्ष पाहून जाणून घेतली.
या संपूर्ण उपक्रमादरम्यान केंद्रप्रमुख हाके साहेब, मुख्याध्यापक श्री. शाहनवाज सर तसेच शिक्षिका शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांची प्रत्यक्ष माहिती मिळून त्यांचा आत्मविश्वास व ज्ञान वाढण्यास मदत झाली.






















