आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पनवेल : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राजश्री शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर, दादर (प.) येथे प्रा. श्याम मानव यांचे ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होत असतानाही अनेक भोंदू बाबा, बुवा आणि तथाकथित महाराज समाजात लोकांची फसवणूक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अलीकडील खरात प्रकरणातून अनेक सुशिक्षित लोकसुद्धा अशा भोंदूगिरीला बळी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध अवैज्ञानिक दावे करून लोकांना मानसिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर फसविण्याचे प्रकार वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रा. श्याम मानव हे भोंदू बाबांचे प्रकार, त्यामागील मानसिकता आणि विशेषतः महिलांची अशा बाबांकडे होणारी फसवणूक याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा संघटक नरेंद्र जाधव यांनी केले आहे.























