आनंद मनवर
जिल्हाप्रतिनिधी रायगड
परळी (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून झाली असून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरातील शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी सुधागड तालुक्याच्या सन्माननीय सभापती सौ. जागृती राजेश मानकर यांनी उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना फुल व खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सौ. जागृती मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविण्याचा मूलमंत्र दिला. “मी देखील याच रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. शिक्षण व परिश्रमाच्या जोरावर आज मला सुधागड तालुक्याचे सभापती पद मिळाले,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश मानकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, माता पालक संघाचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, परळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हाके सर, मुख्याध्यापक श्री. शहाणवाज शेख सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी झाली.























