आनंद मनवर
जिल्हाप्रतिनिधी रायगड
नेरळ, दि. ६ – भारतरत्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती, तत्वज्ञ व शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेरळ मल्टिस्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने ‘मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी’ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक कोकण विभाग शिक्षक आमदार मा. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक भगत यांनी सर्व मान्यवरांचे शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सुहास्यवदनाने स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की या शिबिरात मोठ्या संख्येने शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव-भगिनींसाठी रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हिमोग्लोबिन, बी.एम.आय. सी पी आर प्रशिक्षण आदी विविध वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून हे शिबिर संपूर्ण आठ दिवस सुरू राहणार आहे.डॉ. भगत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आज मी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या ज्ञानसंस्कारामुळे शक्य झाले आहे. शिक्षक हेच खरे समाजाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला अल्पदरात उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी हे हॉस्पिटल उभारले आहे.महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप म्हसे सर यांनी सांगितले की,नेरळसारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी होणे ही काळाची खरी गरज होती. सरपंच महेश विरले, डॉक्टर श्रुती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ. विवेक भगत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून शिक्षक व ग्रामीण जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. उद्घाटक आमदार मा. डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. भगत यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते” या संस्कृत श्लोकाप्रमाणे जगात दोनच व्यक्तींचा सन्मान केला जातो – शिक्षक व डॉक्टर. या दोन्ही व्यक्ती समाजासाठी आदर्श आहेत.या वेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हा, तालुका व विभागीय पदाधिकारी, तसेच डॉ. दीपक सिंग, डॉ. हेमंत इंगोले, डॉ. श्रुती शिंदे (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. प्रियंका परदेशी (जनरल सर्जन), डॉ. मिनिष कोटकर ऑर्थोपेडिक सर्जन,मा. श्री. महेश विरले कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच, श्री. विवेक पोतदार संयुक्त सचिव विद्या मंडळ, दादर, श्री. रमेश कुंभार व्यवस्थापक नेरळ विद्या मंदिर, श्री. संतोष कांबरी कर्जत तालुका अध्यक्ष – शिवछत्रपती शिक्षक संघटना, श्री. अनिल बडेकर खालापूर तालुका अध्यक्ष – शिवछत्रपती शिक्षक संघटना, श्री. शरद कुंभार रायगड जिल्हा प्रतिनिधी, श्री. हनुमंत भगत माजी तालुका अध्यक्ष, डी. के. म्हात्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन अभंगे सर यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले. मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा लाभली. शिक्षकांचे आरोग्य सक्षम असेल तरच ते विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करू शकतात, या जाणिवेतून आयोजित हे शिबिर सर्वार्थाने यशस्वी ठरले. उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त करत पुढेही अशा आरोग्यदायी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे
