आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पाली : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पाली (ता. सुधागड) येथे सुधागड तालुक्यातील संघटनेच्या कार्यकारिणीशी हितगुज साधत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तत्काळ दखल घेतली.
यावेळी श्री. मारुती डोके यांच्या शालार्थ आयडीचा प्रश्न उपस्थित होताच आमदार म्हात्रे यांनी त्वरित संबंधित डीवायडी कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक पाठपुरावा केला. तसेच कै. गणेश खंडागळे सर यांच्या पेन्शन प्रकरण, नोकरी प्रस्ताव तसेच इतर प्रलंबित बिलांबाबत संबंधित कार्यालयांशी संपर्क साधून चौकशी केली.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, वेतन पथक, पेन्शन विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या तत्पर कार्यपद्धतीमुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आमदार म्हात्रे सर यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल व तातडीच्या पाठपुराव्याबद्दल सुधागड तालुका कार्यकारिणी व सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.






















