आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या शाळेतील शिक्षकांचे तब्बल 24 महिन्यांपासून थकीत असलेले वेतन अखेर शासनाच्या दरबारी पोहोचले असून, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 6 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी डेक्कन एज्युकेशन संस्था व आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश दिले. “शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे गंभीर बाब असून यापुढे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी यापूर्वी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने तातडीने बैठक बोलावून प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली. बैठकीत संबंधित संस्थांची जबाबदारी निश्चित करून थकीत वेतन त्वरित देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही उपस्थित राहून शिक्षकांच्या बाजूने भूमिका मांडली. तसेच सहाय्यक संचालक श्रीराम पानझडे, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, आरसीएफ कंपनीचे व्यवस्थापक, डेक्कन एज्युकेशनचे प्रतिनिधी, आरसीएफ शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
शासनाच्या या भूमिकेमुळे दीर्घकाळ वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.























